Thursday, January 20, 2011

महाभारत - अध्याय १

महाभारत या एकाच विषयावर गेल्या काही दिवसात बरेच ग्रंथ वाचून झाले... पण अजूनपर्यंत महाभारत एकदाही नाही वाचले याची प्रांजळ कबुली दिली पाहिजे..
सुरुवात होते ती मृत्युंजय पासून. 'ययाती', राधेय, युगंधर अश्या अनेक कादंबऱ्या आणि युगांत, महाभारत एक सूडाचा प्रवास आणि व्यासपर्व अश्या विश्लेषणपर पुस्तकांच्या वाचनातून महाभारता बद्दलची ओढ अजून वाढते.
ययाती हे महाभारतातील एक उपाख्यान आहे..वि.स.खांडेकर यांनी या उपख्यानाचे धागेदोरे कालिदासाच्या शाकुंतल मधील कण्व मुनींच्या एका आशीर्वचनाच्या आधारे अगदी स्वतंत्रपणे गुंफले आहेत.. परंतु हे उपाख्यान पूर्णतः वेगळे आहे.. ययाती वाचल्यानंतर आपण शर्मिष्ठेच्या प्रेमात पडतो आणि देवयानी कडे एक खाष्ट बायको याच नजरेने पाहतो.. महाभारतातील उपाख्यान नेमके याच्या उलट सांगते..
तिथे देवयानी पतिव्रता ठरते..
मग हे उपाख्यान त्यांच्या समोर असताना त्यांनी अशी का रचना केली कि ज्यामध्ये शर्मिष्ठा हि त्या पुस्तकची नायिका बनते? मला हा प्रश्न नेहेमी पडतो.. त्यांच्या प्रस्तावनेत काही अंशी उत्तर सापडते.. पण शाकुंतल प्रमाण मानायचे आणि कथाभागातील पात्रांची implications दुर्लक्षित ठेवायचे, असे त्यांनी का केले हा पुढचा प्रश्न मला पडतो.. कुणीतरी म्हणेल कि त्यांनी समाज जीवनाचे प्रतिबिंब म्हणून हि कादंबरी लिहिली.. परंतु ज्या काळातील समाज जीवनावर त्यांनी कादंबरी लिहायचे ठरवले त्या काळातील ययाती, देवयानीची पत्रे त्यांनी कालानुरूप बदलली किंवा त्यांच्याच शब्दात सांगायचे तर देवयानी तर त्यांना सर्वात शेवटी लिहिलेले पात्र आहे, तेव्हा त्यांनी शर्मिष्ठा पण त्या काळनुरूप का नाही बदलली? १९१३ सालची शर्मिष्ठा तशीच्या तशी त्यांच्या कादंबरीत दिसते.. मग ती खरेच शार्मिष्ठेची प्रेमकथा म्हणून घ्यावी कि १९५२ सालच्या देशाच्या समाजजीवनाचे प्रतिबिंब म्हणून घ्यावी असा मला प्रश्न पडतो.. कदाचित यातील सर्वच मुद्दे, प्रश्न बाळबोध असतील.. पण मला असे प्रश्न नेहेमी पडतात..

क्रमशः